अडचणीच्या काळात बीडकरांनी  दाखविलेला विश्‍वास आणि प्रेम कधीही विसरता येणार नाही

Beed

कुटे दाम्पत्य पत्रकार परिषदेत भावनिक
बीड दि.15 (प्रतिनिधी): येथील उद्योग जगात मोठे नावलौकिक मिळविलेल्या कुटे ग्रुपवर मागच्या चार दिवसांपासून आयकर विभागाने छापेमारी सुरू केली होती. रविवारी सायंकाळी 5 वा. आयकर विभागाचे अधिकारी गेले. यानंतर पत्रकार परिषदेत कुटे दाम्पत्यांनी बीडकरांनी अडचणीच्या काळात दाखविलेला विश्‍वास आणि प्रेमातून कधीही उतराई होणे शक्य नसल्याचे सांगत सुरेश आणि अर्चना कुटे पत्रकार परिषदेत भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.
पत्रकार परिषदेत श्री. कुटे यांनी,आमच्यावर झालेली छापेमारी माझ्यासाठी हा धक्का होता.17 वर्षात आम्ही ज्ञानराधाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्‍वास जपला आहे.51 शाखेतून आम्हाला सर्वांनी खूप पाठिंबा दिला. हे कधीच विसरू शकत नाही. 40 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की,आयकर विभागाचे अधिकारी यांनी आम्हाला छापेमारी सुरु असताना व्हिडिओ प्रदर्शित करण्याची चक्क संधी दिली. जे इतिहासात कधीच घडले नव्हते ते बीडमध्ये घडले आहे.माझा जीव चार दिवसात खूप कासावीस झाला. लोकांना भेटता येतं नव्हते. ग्राहक चिंतेत होते, पण काळजी करण्याची आता कोणालाही गरज नाही. आम्ही जे आहोत ते आपल्यामुळेच,आता सर्व सुरळीत होईल. उद्यापासून मी बँकेत पुन्हा सर्वांना भेटणार आहे. आज दोन तासात अनेक शाखांना भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
छापेमारी सुरु असताना अधिकार्यांना आमचं घरही साध आहे.आम्ही साधी माणसं आहोत, हे नंतर कळाले.खरं तर आपल्या प्रेमाने आम्हाला मोठं केल पण आम्ही जमिनीशी नाळ जोडली आहे. अडचणीच्या काळात ग्राहकांनी आम्हाला खूप जीव लावला. यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं.सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही खूप भरवल्याचे सांगत सुरेश कुटे भावनिक झाले होते.
यानंतर अर्चना कुटे यांनी सांगितले, कुटे ग्रुप मी पाहते. आणि सुरेश कुटे हे बँक पाहतात. दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. इन्कम टॅक्सची तपासणी सर्वत्र होते, मात्र आमच्यासाठी हा धक्का होता. यातून आम्ही खूप मोठे माणसं झालो की काय असे वाटू लागले. यातून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.आपली माणसं ओळखता आली. तुमचा विश्‍वास आम्हाला बळ देणारा ठरल्याचे सांगत त्यांनी सर्वांचेच आभार मानले.