पाण्याच्या टॉकीवर चढून युवकांचे आंदोलन


शिवाजी नगर पोलिसांच्या मध्यस्तीने आंदोलन स्थगित
बीड। प्रतिनिधी
बीड शहराला गेल्या 33 दिवसापासून नळाला पाणी आलेले नाही. त्यामुळे येथील नागरीकांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे पालवन चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून काही युवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत नागरीकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत टाकीवरून खाली न उतरण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. परंतू शिवाजी नगर पोलिसांच्या मध्यस्तीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दुष्काळाच्या झळा सुरू असतानाच बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही खराब झाली असल्याने गेल्या 33 दिवसापासून बीड शहराला पाणी आलेले नाही. त्यामुळे येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसापासून पाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेही करण्यात आले आहेत. परंतू प्रशासनाला याची जाग आल्याचे दिसून येत नाही. मंगळवारी रात्री अविनाश कांबळे, पंकज धांडे यांच्यासह काही युवक पालवन चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. परंतू शिवाजी नगर पोलिसांनी त्यांनी समजूत काढून त्यांचे आंदोलन स्थगित केले.

