पुण्यात पुन्हा भीषण अपघात.! फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं, तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू..

प्रतिनिधी - पुणे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, यातील बहुतेक चर्चित आणि धक्कादायक घटना ह्या पुण्यात घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, पुन्हा एका भीषण अपघातामुळे महाराष्ट्र हादरला आहे.
पुण्यातील वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता, घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरड केली आणि डंपर दुसऱ्या बाजुला घालायला सांगितलं मात्र, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपातवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. यामध्ये तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवरती सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं, 'आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला'.
जखमी आणि मृत व्यक्तींची नावे समोर
या दुर्घटनेत विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नगेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18) आलिशा विनोद पवार (47) अशी या ६ जणांची नावे आहेत. या दुर्घटनेतील जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे. हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत.

