आष्टीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत खलबतं

Beed

मुंबई (प्रतिनिधी)- आज आष्टी विधानसभेच्या जागेवरून मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आष्टी मतदार संघातील आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीस आष्टी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे तर भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले माजी मंत्री सुरेश धस व माजी आ.भीमराव धोंडे उपस्थित होते.

जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ झालेल्या बैठकीमध्ये इच्छुकांनी आपापली मते मांडली यामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बाळासाहेब आजबे यांना घड्याळाचे तिकीट दिल्यास मी त्यांचे काम करण्यास तयार असल्याचे सांगितले तर दुसरीकडे बाळासाहेब आजबे यांनी भीमराव धोंडे यांना कमळ चिन्ह दिल्यास त्यांचे काम करण्याची तयारी दाखवत,मात्र असे न झाल्यास दोघांनीही बंडखोरीची अथवा अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.यावेळी माजी मंत्री आणि विधानसभेसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार असलेले सुरेश धस यांनी मात्र पक्षाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे आष्टी विधानसभेचे घोंगड अद्यापही भिजत असल्याचे एकंदरीत चित्र असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.