अज्ञानातून ज्ञानाच्या सागरात आपणांस घेऊन जाण्याचे कार्य ग्रंथालय करते-अनिल साबळे

Beed

तुलसी महाविद्यालय ग्रंथालयाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या हस्ते उद्घाटन

बीड/ बीडसत्ता
 शिक्षण हा मानवी समाजाचा सर्वांगीण विकासाचा मूलभूत पाया आहे. शिक्षणामुळे  समाजात शिक्षित आणि सुसंस्कृत वर्ग तयार होत असतो. चांगले विचार शिक्षण आणि वाचनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी या ग्रंथालयाचा उपयोग करावा,असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी केले. पुस्तकांमधून आपण बरेच काही शिकू शकतो, पुस्तके झेप घेत असलेल्या प्रत्येक पंखाला उडण्यासाठी ज्ञानाचे बळ देण्याचे काम करीत असतात. तसेच वाचनाने माणूस जुना राहत नाही नवा बनत असतो, त्याच्या जीवणाला आकार प्राप्त होत असतो.तुलसी समूहाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य प्रा.प्रदिप रोडे यांनी हाती घेतल्याने असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा लाभ नक्कीच होईल असे अनिल साबळे यांनी सांगितले तसेच प्रा.रोडे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

येथील तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील अत्याधुनिक, सुसज्ज असलेल्या नवीन ग्रंथालय इमारत, संगणक प्रयोगशाळा तसेच संगणकीय कक्ष उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय बीड येथे करण्यात आले होते. रिबन कापून ग्रंथालयाचे उद्घाटन शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.प्रदिप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा ग्रामीण विकास संस्था प्रकल्प संचालक अशोक  सिरसे, बीडचे सहाय्यक समाज कल्याण  आयुक्त रवींद्र शिंदे, राजेंद्र करुणा एज्युकेशन अँड वेलफेअरचे राजेंद्र वाघ, बीड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, इंजिनिअर कपिल रोडे, प्रा.सगिर शेख, गुरुकुल कॉलेजचे प्राचार्य डॉ. हनुमंत भूमकर, तुलसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.एम.थोरात,उपप्राचार्य डी.जी.निकाळजे, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन भालेराव यांची उपस्थिती होती. 
या ग्रंथालयाचे कौतुक करताना अध्यक्ष प्रा प्रदीप रोडे म्हणाले की, नवीन ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन ही अभिमानाची बाब आहे आणि हा अभिमान आणखी वाढतो कारण या लायब्ररीचे उद्घाटन शिक्षण उपसंचालक मा.अनिल साबळे यांच्या हस्ते झाले, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत या ग्रंथालयाने अनेक पिढ्यांची ज्ञानाची भूक भागविल्याचे सांगत महाविद्यालयाने घेतलेली उंच भरारी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी आहे असे सांगितले. 
 यात विद्यार्थ्यांसाठी  पूर्वीपेक्षा जास्त अभ्यासिकेची क्षमता वाढवून अनेक विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. अभ्यासिका सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत व  रात्रीसुध्दा अभ्यासिका सुरु केलेली आहे. तसेच इंटरनेट, वायफाय यंत्रणाही कार्यन्वित केलेली असून ई-बुक्स, ई डेटा बेस, ई जर्नल  अक्सेसचा फायदा घेत आहेत. ई बुक रिडिंगची वेगळी सोय असून, नऊ कंम्प्युटर उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उल्लेखनीय योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगिता लांडगे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.शिल्पा बोराडे यांनी केला तर प्रस्ताविकात उपप्राचार्य प्रा डी.जी. निकाळजे यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार डॉ.विकास वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.