वीज कोसळून खुरपणी करणाऱ्या तीन महिला ठार

गेवराई- खुरपणी करताना अचानक पाऊस सुरू झाला. सुरक्षित ठिकाणी जात असताना वीज कोसळल्याने तीन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना चकलंबा (ता.गेवराई) शिवारात आज बुधवारी (दि.२६) सायंकाळी घडली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शालन शेषराव नजन ( वय ५५ वर्ष ),लंका हरीभाऊ नजन ( वय ४२ वर्ष),विजया राधाकिस खेडकर (वय४५वर्ष) असे वीज कोसळून ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर यमुनाबाई माणिक खेडकर असे जखमी महिलेचे नाव आहे. चकलंबा (ता.गेवराई) शिवारात खुरपणी करत होत्या, सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच त्या सर्वजणी सुरक्षित ठिकाणी जात असताना अचानक कडकडाट करत वीज या चौघींच्या अंगावर कोसळली. यात वरील तीन महिलांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी आहे. जखमी महिलेवर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बातमी गेवराई तालुक्यासह जिल्हाभरात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

