झोपेत असलेल्या दोन तरुणांना टिप्परने चिरडले !

Beed

बीड- खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोकलेन बाजूला उभा करून त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेल्या दोन पोकलेन ऑपरेटरला टिप्परने चिरडल्याची दुर्देवी घटना आज पहाटे पाली परिसरात उघडकीस आली. या घटनेत दोन्ही ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाला असून टिप्पर चालकाने टिप्पर ग्रामीण पोलीस ठाण्यात उभे केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बीड तालुक्यातील परिसरात एका ठिकाणी पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू होते. मुरूम भरण्यासाठी त्याठिकाणी टिप्पर देखील आलेले होते. काल रात्री खोदकाम झाल्यानंतर पोकलेनचे ऑपरेटर सुभाष कुमार चव्हाण (वय ३५ रा. बिहार) आणि समाधान बाळु थोरात (वय २३ रा. सावरगाव ता. बीड) हे दोघे जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात झोपले होते. मध्यरात्री त्याठिकाणी मुरूम भरण्यासाठी आलेले टिप्पर क्र.एम.एच.२३. ए.यु.२००३ हा रिव्हर्स घेत असतांना त्याने पाठीमागे पाहिलेच नाही. त्यामुळे टायरखाली आल्याने झोपेत असलेले सुभाष कुमार चव्हाण आणि समाधान थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. आज पहाटे ही दुर्देवी घटना उघडकीस आली. सदरील टिप्पर ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतला असून ते खोदकाम कोठे सुरू होते ? चालक कोण होता ? याचा पोलीस तपास करत आहेत.