औषधी गोळ्यांच्या नशेखोरीने बीडमधील तरुणाचा घेतला बळी

बीड- औषधी गोळ्यांच्या नशेखोरीने एका ३५ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आज बीड शहरात घडली. एकाच वेळी नशेच्या २४ गोळ्या खाल्ल्यानंतर ओव्हरडोस झाल्याने बेशुद्ध पडलेल्या तरुणाला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नशेची औषधी विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
बीड शहरातील सद्दाम पठाण रहीम पठाण (वय-३५) रा.दिलावर नगर पेठ बीड असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे नशेच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे तो अचानक बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून तो औषध गोळ्यांच्या माध्यमातून नशा करत होता, मात्र मध्यंतरी रमजान महिन्यात त्याने नशा करणे सोडून दिले होते.
त्यानंतर हा महिना संपल्यानंतर त्याने एकाच वेळी नशेच्या २४ गोळ्या खाल्ल्या, एकाच वेळी घेतलेल्या २४ गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे अस्वस्थ वाटून तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यु झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आज सकाळी सद्दाम पठाण याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

