वडापाव फुकट दिला नाही म्हणून एकास मारहाण

गेवराई- तालुक्यातील तलवाडा हद्दीत असलेल्या कठोडा येथे वडापाव फुकट दिला नाही म्हणून एकास मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्यास अटक करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
अधिक माहिती अशी कि, तलवाडा येथील काठोडा गावातील मंदाबाई कोरे या देव दर्शनासाठी मंदीराकडे जात असतांना आरोपी सुनिल कोरे, मच्छींद्र कोरे यांनी वडापाव वाल्याला वडापाव फुकट का देत नाही म्हणत शिवीगाळ व मारहाण करत होते. यावेळी मंडाबाई यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. मारहाण करत डोक्यात कुऱ्हाडीने दुखापत केली. या प्रकरणी मंडाबाई कोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल कोरे व मच्छिंद्र कोरे यांच्याविरूध्द तलवाडा पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भांदवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून कष्टकरी वडापाव चालकाला फुकट वडापाव दे म्हणत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मंडाबाई कोरे यांच्याकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह. खाडे हे करीत आहेत.

