आरक्षण मिळाले


मराठ्यांच्या घरी आज दिवाळी
मुंबई/प्रतिनिधी
राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयर्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होऊन त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं.
मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगेसोयर्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयर्यांना त्याच जातप्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका..तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टीकला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मराठा समाजासाठी आजचा दिवस सुवर्णदिन असेल-गणेश बजगुडे पाटील 
बीड /बीडसत्ताप्रतिनिधी
27 जानेवारी 2024 हा दिवस मराठा समाजासाठी सुवर्णदिन असुन मराठा आरक्षणाच्या आजच्या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांचे भविष्य घडेल. स्व. आ. आण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील इथपर्यंत अनेक नेते मंडळी समाजाच्या हितासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढत होते मी स्वतः या लढ्यात गेली वीस वर्षे सक्रिय काम करत आहे. माझ्या नेतृत्वात ही अनेक आंदोलने झालेली आहेत, काठ्या लाठ्या जेल देखील आम्ही भोगलेले आहे. हा विजय मराठा आरक्षण चळवळीत सहभागी सर्व समाजबांधवांचा व मनोज जारांगे पाटील यांच्या प्रामाणिक पणाचा असुन समाजातील तरुणांचा यामुळे निश्चितच फायदा होईल आजचा दिवस हा आमच्यासाठी सुवर्ण दिन आहे परंतु आमचा हक्क आम्ही मागत असताना आमच्या मायमावल्याना अंथरलीत रक्त सांडावे लागले, अनेक निरपराध तरुणांना जेल भोगावे लागले, अनेक बांधवांनी आपला जीव ही गमावलेला आहे. आण्णासाहेब पाटील यांनी देखील 22 मार्च 1982 ला विधानभवनावर मोर्चा काढून आरक्षणासाठी पाहिले बलिदान दिलेले आहे म्हणून आज नवी मुंबई येथे मी त्यांना अभिवादन करून सर्व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. असे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी आपल्याशी बोलताना सांगितले..

