जिल्हाप्रमुख खांडे बीड विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांकडे उमेदवारी मागणार


सरपंच,उपसरपंच संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करणार-जिल्हाप्रमुख खांडे
बीड/बीडसत्ता प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सरपंच/उपसरपंच संघटना महाराष्ट्र या संघटनेची घोषणा करत ही संघटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी राज्य पातळीवर काम करेल असा विश्वास प्रकट केला. तसेच बीड विधानसभा निवडणूकीसाठी आपली तयारी असून मुख्यमंत्री जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असल्याचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
बीड येथील शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, सरपंच/उपसरपंच संघटना ही संपुर्ण महाराष्ट्रभर काम करणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचा मुहुर्त राखून आम्ही या संघटनेचे काम सुरु करत आहोत. सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांच्या अडी अडचणी दुर करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी ही संघटना काम करणार आहे.या संघटनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी केतुरा ग्राम पंचायतचे सरपंच परमेश्वर तळेकर यांची नियुक्ती या प्रसंगी खांडेंनी जाहिर केली. सन 2001 पासून मी सरपंच, उपतालूकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख पदावर काम केलेले आहे. ग्राम पंचायत व पंचायत समितीचा अनुभव पाठीशी आहे. बीड विधानसभा क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून मी कार्यरत आहे. सध्या बीड विधानसभा क्षेत्रात सध्या 376 ठिकाणी बुथप्रमुख आणि प्रत्येक ठिकाणी 10 शिवदुत आम्ही तयार केलेले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे मी बीड विधानसभेसाठी उमेदवारी मागणार आहे. आणि संपुर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. ना.एकनाथराव शिंदे यांना सर्वांचे काम माहित आहे. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. बीडमध्ये लवकरच मराठवाडा स्तरीय सरपंच, उपरसंपच यांचा मोठा मेळावा घेणार आहे. लवकरच संघटनेच्या विविध पदांवर नियुक्ती जाहिर करण्यात येणार आहे असे कुंडलिक खांडे यांनी सांगितले.

