विद्यापीठ नामविस्ताराच्या लढ्यात शहीद झालेल्यांचे बलिदान लाखमोलाचे- उत्तम डावरे 

Beed

बीड/बीडसत्ता प्रतिनिधी 
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी  मोठा लढा उभारावा लागला या लढ्यामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी नागरिकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे विद्यापीठ नामविस्तार झाला. विद्यापीठ नामविस्ताराच्या या लढ्यातील शहीदांनी दिलेले बलिदान हे लाखमोलाचे आहे. त्यांच्या बलिदानांचे, त्यागाचे स्मरण भावी पिढीला प्रेरणा देणारे आणि आंबेडकरी चळवळीला स्फूर्ती देणारे आहेत असे विचार राष्ट्रीय समता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम भाऊ डावरे यांनी नामविस्तार दिनाच्या निमित्ताने बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

  कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर निवडक मान्यवरांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांना व चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उत्तम भाऊ डावरे म्हणाले की,मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी राज्यासह मराठवाड्यामध्ये मोठा लढा उभारावा लागला. यासाठी मराठवाड्यातील अनेक आंबेडकर प्रेमी नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळेच मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव 14 जानेवारी 1994 रोजी मकरसंक्रांत सणाच्या दिवशी दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे नाव विद्यापीठास मिळाल्यामुळे मराठवाड्यातील  विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण झाली. त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रूजू लागले.
त्या करिता आपण जसे सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी राष्ट्रीय सण धार्मिक सण उत्सव साजरे करतो आगदी त्याच प्रमाणे आपण सर्वांनी प्रति वर्षी 14 जानेवारी हा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा केला पाहिजे. एकंदरीतच शहीदांनी दिलेले बलिदान हे लाखमोलाचे आहे. त्यांच्या बलिदानांचे, त्यागाचे स्मरण हे भावी पिढीला प्रेरणा देणारे आणि आंबेडकरी चळवळीला स्फूर्ती देणारे आहेत असे शेवटी उत्तम भाऊ डावरे यांनी सांगितले. यावेळी अविनाश पायके, मनोहर पायके, आत्माराम वाव्हळकर, शिवप्रसाद सिरसाट, चोखोबा पायके, लिंबाजी वाव्हळकर, तेजेस सिरसाट, कसबे, सुरेश गजगे यांच्यासह बीड शहरातील विविध भागातून शेकडो आंबेडकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आत्माराम वाव्हळकर यांनी मानले.