ओबीसी समाजाचे हृदयसम्राट ना. छगन भुजबळ आज बीडमध्ये

ओबीसी महाएल्गार सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सकळ ओबीसी समाज बांधवांचे आवाहन
बीड/बीडप्रतिनिधी
आज शनिवार दि. 13 जानेवारी रोजी बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात दुपारी 4:00 वाजता ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून या महासभेत ओबीसीचे राष्ट्रीय नेते, ओबीसी समाजाचे हृदयसम्राट, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे. या महाएल्गार सभेला बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज बंधू भगिनींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन बीड जिल्हा सकळ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
या महाएल्गार सभेला ओबीसी हृदयसम्राट मा. ना. छगनरावजी भुजबळ यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असून बीड शहरामध्ये ओबीसी समाजाच्या कार्यकर्ते नेत्यांच्या कार्यालय हॉटेल, दुकान, आणि घरावर झालेल्या हल्ल्याचा, जाळपोळीचा समाचार ना. भुजबळ साहेब या महाएल्गार सभेतून घेणार आहेत. जाळपोळीच्या घटनेपासून भयभीत झालेल्या ओबीसी समाजाला धमक्या देण्याचे काम काही समाजकंटक करीत त्या समाजकंटकांचा समाचार देखील ना. भुजबळ साहेब या सभेच्या माध्यमातून घेणार आहेत.
या महाएल्गार सभेचे स्वागताध्यक्ष महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ड. सुभाष राऊत असून याप्रसंगी ना.धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री महादेव जानकर, आ.गोपीचंद पडळकर, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आ. राजेश भैय्या राठोड, माजी आ. केशवराव आंधळे, माजी आ. नारायणजी मुंडे, ओबीसी जन्म मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे, राष्ट्रीय विमुक्त गोमंतू आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गायकवाड, बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव दळे, मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष विजय चौघुले, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मणराव हाके, ओबीसी बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बी. डी. चव्हाण, भाजपा नेते सर्जेराव तांदळे, बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजीराव राऊत, सेवालाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष बी. एम. पवार, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि ओबीसी समाजातील विविध जातींचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी समाजाचे हृदयसम्राट ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मराठा आरक्षणाला कसलाही विरोध नसताना त्यांना आणि ओबीसी समाजाला गेल्या काही दिवसांपासून टार्गेट केले जात आहे. ओबीसी समाज आणि भुजबळ साहेब यांची एवढीच मागणी आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मात्र तरीदेखील मुद्दामहून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशा वाद निर्माण करणार्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाचे हृदयसम्राट ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची तोफ बीड शहरामध्ये आज 13 जानेवारीला धडाडणार आहे. या महाएल्गार सभेसाठी बीड जिल्ह्यातील गाव, वस्ती, तांडा, शहर आदी भागातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव आणि भगिनी उपस्थित राहणार असून ओबीसी समाजाची महाशक्ती या महाएल्गार सभेच्या माध्यमातून दिसणार आहे. महाएल्गार सभेच्या अनुषंगाने बीड शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर ओबीसी समाजाचे ध्वज, स्वागत कमानी आणि बॅनर मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. बीड शहरात आणि जिल्ह्यात ठीकठिकाणी सभेसाठी येणार्या ओबीसी बांधवांकरिता नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या महाएल्गार सभेच्या माध्यमातून ना. छगनरावजी भुजबळ साहेब काय? बोलणार याकडे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसी समाजाच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी या महाएल्गार सभेला ओबीसी समाजातील बंधू, भगिनी, अबालवृद्ध, युवक, युवतींनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सकळ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
ओबीसी व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवावीत!
ओबीसी आरक्षणासाठी होणार्या महाएल्गार सभेच्या अनुषंगाने शनिवार दि. 13 जानेवारी रोजी बीड शहरातील ओबीसी बांधवांनी दुपारी दोन वाजल्याच्या नंतर आपली प्रतिष्ठाणे, दुकाने बंद ठेवून सभेसाठी उपस्थिती लावावी असे आवाहन बीड जिल्हा सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात होत असलेल्या ओबीसी महाएल्गार सभेसाठी उपस्थित राहणार्या महिला, युवतींसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

