ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहा-परमेश्वर वाघमोडे

गेवराई तालुक्यातील वाडी-वस्ती-तांडयावर बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
गेवराई / बीडसत्ता प्रतिनिधी
बीड येथे शनिवार दि.13 जानेवारी 2024 रोजी दुपारी ठिक चार वाजता होणार्या भटके विमुक्त व ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मा.ना.छगनरावजी भुजबळ यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार असून या मेळाव्याला गेवराई तालुक्यातील भटके विमुक्त व ओबीसी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे यासाठी वाडी,वस्ती,तांडे आणि गावागावात कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रासपचे जिल्हाध्यक्ष हभप परमेश्वर महाराज वाघमोडे यांच्यासह अनेकजण ओबीसी समाजाला जागृत करून मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन या बैठकांमध्ये करत आहेत. भटके विमुक्त व ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी लढा उभा केला असून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होऊ देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली आहे. गेवराई तालुक्यातील भटके विमुक्त व ओबीसी समाज बांधवांना जागृत करून बीड येथे 13 जानेवारी रोजी होणार्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी दररोज अनेक गावांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीसाठी बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष - प्रा.पी.टी.चव्हाण, सुघोष नारायणराव मुंढे, रासपचे जिल्हाध्यक्ष हभप परमेश्वर महाराज वाघमोडे, रासपचे अंबादास बाबा पिसाळ, गजानन काळे, बीआरएसचे नेते तथा बीड जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब मस्के, सावता परिषद तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष - बापू गाडेकर, अमोल ढाकणे, रमेश क्षीरसागर यांच्यासह इतर ओबीसी कार्यकर्ते अनेक ठिकाणी बैठका घेऊन भटके विमुक्त व ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी मार्गदर्शन करून आवाहन करत आहेत. मुस्लिम समाजातील ओबीसी बांधवांनी देखील जागृत होऊन आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.पी.टी.चव्हाण यांच्यासह परमेश्वर महाराज वाघमोडे, सुघोष मुंढे, अंबादास बाबा पिसाळ, बीअरएसचे नेते बाळासाहेब मस्के, बापू गाडेकर, दादासाहेब चौधरी, गजानन काळे, संतोष शेजूळ, सुभाष गुंजाळ आदींनी केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. जर आमच्या ताटातलं कुणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशी रोखठोक भूमिका भुजबळ साहेबांसह सर्व समाजातील नेत्यांनीही घेतली आहे. परंतु विनाकारण भुजबळ साहेबांना टार्गेट केले जात आहे. आता बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार वर्गातील भटके विमुक्त व ओबीसी समाज बांधव अशाप्रकारची टिका अजिबात खपवून घेणार नाही असे मत प्रा.पी.टी.चव्हाण यांनी विविध ठिकाणी आयोजित बैठकीत बोलताना व्यक्त केले. भटके विमुक्त व ओबीसी समाज बांधव बीड येथे शनिवार दि.13 जानेवारी रोजी दुपारी ठिक चार वाजता होणार्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याला जाण्यासाठी एकवटले असल्याचे चित्र गेवराई तालुक्यातील वाडी,वस्ती,तांडे आणि गावागावात पहावयास मिळत आहे.

