एकपात्री नाट्यातून सावित्रीमाई फुले यांच्या समाजकार्यचे दर्शन

तुलसी शैक्षणिक समूहाचा सामाजिक उपक्रम
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी
येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त दि.09 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वा तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथे ’मी सावित्री ज्योतीबा फुले बोलतेय!’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सादरकर्ते डॉ. प्रतिभा जाधव (साहित्यिक वक्ता, एकपात्री कलाकार, नाशिक), कार्यक्रमाच्या अध्यक्ष दिपा प्रदिप रोडे (अध्यक्ष, तुलसी महिला मंडळ, बीड), प्रमुख अतिथी प्रा.संध्या जोगदंड (सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड), प्रा.प्रदिप रोडे (संस्थापक अध्यक्ष,देवगिरी प्रतिष्ठान,बीड), प्रा.शामल भिवराव जाधव (मिलीया महाविद्यालय, बीड), प्राचार्य लंकेश्वर थोरात (तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड),उपप्राचार्य डी.जी.निकाळजे (तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड),प्राचार्य उमा जगतकर ( तुलसी इंग्लिश स्कूल, बीड) यांची उपस्थिती होती.
‘मी सावित्री ज्योतीबा फुले बोलतेय!’ या एकपात्री नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणातून नाशिक येथील प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील विविध प्रसंग साकारत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्राचा सखोल परिचय त्यांच्या सादरीकरणातून करून दिला.
यात प्रामुख्याने स्त्री भ्रूणहत्या, महिलांवर होणारे विविध अत्याचार आणि सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी राबविलेले विविध सामाजिक उपक्रम यातील विविध प्रसंगाचे अतिशय प्रभावी सादरीकरण केले. सावित्रीमाई यांच्याआयुष्यातील कठीण संघर्षाच्या प्रसंगांची माहिती देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचीही माहिती त्यांनी एकपात्री सादरीकरणातून करून दिली. त्यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री पवार यांनी केले. सूत्रसंचालन जोत्सना राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजश्री पवार यांनी मानले. यावेळी आयोजक तुलसी इंग्लिश स्कुल बीड, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड, तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती.

