आठ महिन्यांच्या चिमुरडीला पोत्यात बांधून फेकले

Parli-Vai

चिमुकलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू 
बीड/ बीडसत्ता प्रतिनिधी 
परळी तालुक्यात एका 8 महिन्यांच्या चिमुकलीला पोत्यात बांधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने फोन करून ही माहिती दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चिमुकलीस ताब्यात घेतले आहे. सध्या चिमुकलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडीचे प्राण वाचले. मात्र, ती कोण निर्दयी माता आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.

परळी तालुक्यातील मालेवाडी मार्गावर 6 किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेने एका 8 महिन्यांच्या चिमुकलीस चक्क पोत्यात बांधून फेकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चिमुकलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.