राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा  अध्यक्षपदी डॉ.दीपाताई क्षीरसागर

Beed

 पुणे/बीडसत्ता प्रतिनिधी
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.दीपाताई क्षीरसागर
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी बीड शहराच्या माजी नगराध्यक्ष, के.एस.के. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. दीपाताई भारतभूषण क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल बीडसह मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या मातोश्री असलेल्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांचे शिक्षण, नाट्यकला क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष आहेत. तसेच, नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळ सदस्य, कार्यकारिणी सदस्य आहेत. बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या बीड येथील शिक्षक साहित्य संमेलनाचे (2009) अध्यक्षपद भूषविले आहे. त्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या आजीवन सदस्य आहेत. डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रासोबतच नाट्यकला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मराठवाडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल बीडसह मराठवाड्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नाट्यकला, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनांकडून अभिनंदन केले जात आहे.
नाट्यकला क्षेत्रातील योगदानाची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या नाट्यकला क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी डॉ.दीपाताई क्षीरसागर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र पक्षश्रेष्ठींच्या हस्ते लवकरच दिले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पक्षाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
        -डॉ.दीपाताई क्षीरसागर
        मराठवाडा अध्यक्ष, राष्ट्रवादी  सांस्कृतिक विभाग.