सुनील क्षीरसागरांनी जपली आवाज नसलेल्यांशी बांधिलकी-सुभाष वारे

Beed

बीड/बीडसत्ता 
पत्रकारिता आणि वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून सुनील क्षीरसागरांनी कायम आवाज नसलेल्यांचा आवाज होण्याचे काम केले. आवाज नसलेल्यांशी बांधिलकी जपण्याचे ’मराठवाडा’ चे व्रत सुनील क्षीरसागरांनी पुढे नेले असे प्रतिपादन संविधान अभ्यासक सुभाष वारे यांनी केले. पत्रकार, कार्यकर्ता असलेल्या सुनील क्षीरसागर यांच्या   कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि वयाची एकसष्ठीनिमीत्त आयोजित सेवागौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, संयोजन समितीचे अध्यक्ष अशोक देशमुख, सुनील क्षीरसागर, हेमा क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

सुभाष वारे म्हणाले की समाजामध्ये जेव्हा खूप निराशेचं वातावरण असतं त्यावेळी चांगलं काम करणारांचे सत्कार प्रेरणा देणारे असतात. सुनील क्षीरसागर यांनी कायम पडद्यामागे राहून सामाजिक कार्य केले. हजेरी सहाय्यक संघटनेसाठी त्यांनी सक्रिय योगदान दिले. ’आपलं घरं’ च्या लेकरांसाठी सुनील क्षीरसागर यांचं घरं कायम उघडं राहिलं, त्यांच्यासाठी हेमाताई आणि सुनील क्षीरसागर यांनी खुप कष्ट घेतले. बोलण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा जास्त विश्‍वास आहे. अनेकांना लिहितं करण्याच त्यांच काम वैशिष्ट्यपूर्ण आहे.एक ताठ कण्याचा संपादक म्हणून ते काम करित आहेत. आज फॅसिझम वाढत असताना, मोकाट सुटलेलं भांडवल अगदी माध्यमातही धुमाकूळ घालत असताना केवळ पत्रकारांनी मुकाबला करावा असं म्हणून चालणार नाही, तर त्याचा आपल्याला संघटीत मुकाबला करावा लागेल असेही सुभाष वारे म्हणाले. एआय अर्थात कृत्रीम बुध्दीहत्तेच देखील मोठ संकट समोर येत असल्याचही वारे म्हणाले. माणूसपणाच सत्व जपण्याचं, पुढं नेण्याचं काम आपल्यापरीने पुढे नेणारी जी माणसं आहेत सुनील क्षीरसागर त्यापैकी एक आहेत. अशाच साध्या पणत्यांची आपल्याला मशाल करायची आहे असेही वारे म्हणाले.
पन्नालाल सुराणा यांनी यावेळी पत्रकारिता करताना सुनील क्षीरसागर यांनी कधी सत्व सोडलं नाही. तरुण पिढीला विकासाच, सामाजीकतेच भान देण्याचं काम त्यांनी केलं. सामाजिक काम आग्रहपूर्वक करणारा कार्यकर्ता म्हणून सुनील क्षीरसागरांनी ओळख जपली असे सांगितले आणि सुनील क्षीरसागर यांचे तरुण पिढीने अनुकरण करावे असेही सुराणा म्हणाले.अशोक देशमुख यांनी सुनील क्षीरसागरांची पत्रकारिता व्यवस्थेवर जरब बसविणारी होती, त्यासोबतच रचनात्मक होती. त्यांनी स्वत: पत्रकारिता करतानाच अनेक पत्रकार घडविले आणि दैनिकही उभी केली असे सांगितले.प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले. मानपत्रांचे वाचन डी डी बनसोडे आणि समीर लव्हारे यांनी केले. आभार अभिषेक सोळुंके यांनी मानले.यावेळी सुनील क्षीरसागर यांच्यावरील ’अवलिया’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

समाजाच्या प्रेमामुळेच मी टिकून राहिलो: क्षीरसागर
समाजकार्य करायचं म्हणून मी जेव्हा पन्नालाल सुराणा यांना बोललो त्यावेळी त्यांनी ’मराठवाडा’ दैनिकात पाठविलं. माझं मराठवाडयात कोणी ओळखीचं नव्हतं, पण या भागाने, इथल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. इतकं प्रेम कदाचित मला पश्‍चिम महाराष्ट्रातही मिळालं नसतं. वेगवेगळ्या चळवळी आणि संघटनांमधील लोकांनी प्रेम दिलं म्हणून माझा आजवरचा प्रवास होऊ शकला. या प्रवासात, माझ्या प्रत्येक उपक्रमात हेमा क्षीरसागर यांनी मला मोठी साथ दिली. या सगळ्या काळात वेगवेगळ्या संघटना, चळवळींमधून मला आनंद मिळविता आला. इथल्या लोकांच्या प्रेमामुळेच मी टिकून राहिलो असे सुनील क्षीरसागर म्हणाले.